ध्वनी प्रदूषणाने त्रस्त पुणेरी MR लेले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत गेले ....

 ध्वनी प्रदूषणाने त्रस्त पुणेरी MR लेले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत गेले ....

ध्वनी प्रदूषणावरून पुण्याच्या विलास लेलेंनी थेट 
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना पाठवलेले पत्र.
खालीलप्रमाणे ....
दि.१०.०९.२०२२

श्री.एकनाथजी शिंदे.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मुंबई.
विषय ‌: बंधनमुक्त गणेशोत्सव.
महोदय,
आपण आघाडीमुक्त महाराष्ट्र करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात म्हणून सर्व प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.
महोदय,
आपण आता ठाण्याचे किंवा ठाण्यातील मंडळाचे प्रमुख नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात,हे लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीत जनतेच्या हिताचे योग्य निर्णय घ्यावेत ही विनंती. 
फक्त प्रसिद्धी व मुठभर कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी आपण बंधनमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केल्याने दहा दिवस पुणे शहर वेठीस धरले गेले असे होऊ नये,आपण महाराष्ट्रात बंधन मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे घोषीत केलेत त्या प्रमाणे गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक पार पडली.परंतु गणेशोत्सव काळात दहा दिवस समस्त पुणेकर वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः हैराण झाले होते तसेच मिरवणूकीत काही मंडळांचे अपवाद वगळता ३२.५ तासांच्या मिरवणुकीत कुठेही आपल्या धार्मिक परंपरा,आपल्या रूढी,रीती रिवाज,शिस्त यांचा लवलेशही नव्हता.होता तो फक्त प्रचंड धांगडधिंगा आणि नंगानाच.गणेशोत्सवात कुठलेच बंधन नसल्याने मनमानी पद्धतीने मिरवणूक सुरू होती आणि ध्वनी प्रदूषणाचा तर अक्षरशः अतीरेक झाला या ध्वनी प्रदूषणाने आज पर्यंतच्या सर्व मर्यादा ओलांडल्या इतक्या की विसर्जन मिरवणूक मार्गावरील रहिवाशांना दोन दिवस घरात राहणे अशक्य होते,त्यामुळेच पुण्यातील सर्वात वाईट गणेश विसर्जन मिरवणूक,अशी ऐतिहासिक नोंद दि.१०.०९.२०२२ रोजी  झाली असे मला वाटते.
महोदय,श्री एकनाथ जी शिंदे मुख्यमंत्री,व श्री देवेंद्र जी फडणवीस उपमुख्यमंत्री म्हटल्यावर कार्यकर्त्यांना निश्चितच काहीतरी शिस्त लागेल,वेळेचे नियोजन होईल, ध्वनी प्रदूषण होणार नाही,वाहतूक कोंडी कमीत कमी होईल आणि अतिशय मंगलमय धार्मिक वातावरणात आदर्श अशी विसर्जन मिरवणूक पार पडेल अशी अपेक्षा होती परंतु तसे काहीच झाले नाही उलट बंधन मुक्त गणेश उत्सव या आपल्या एका वाक्याने कार्यकर्त्यांना बेशिस्त आणि बेधुंद धांगडधिंगा करण्यास मजबूत प्रोत्साहनच मिळाले.आणि पोलीस खाते हतबल झाले.
महोदय सामान्य नागरिकांन प्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांचे ही गेले महिनाभर प्रचंड हाल झालेले आहेत.विसर्जन मिरवणुकीच्या वेळी तर सलग ३३ तास कार्यकर्त्यांचा धिंगाणा आणि ध्वनी प्रदूषणाचा अत्याचार सहन करण्या पलीकडे पोलीस खाते काहीही करू शकले नाही कारण आपला बंधन मुक्त गणेशोत्सव होता.अशा परिस्थितीत राज्यकर्ते पोलीस खात्याची साधी दखलही घेत नाहीत हे राज्याचे व पोलीस खात्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

महोदय,माझी आपणास नम्र विनंती आहे की नवरात्रात आपल्या बंगल्यासमोर आणि मंत्रालयासमोर फक्त चार दिवस सलग चार तास,डी जे बडवा म्हणजे सामान्य जनतेचे आणि आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांचे काय हाल झाले असतील याची कदाचित आपल्याला कल्पना येईल.महोदय आजच्या विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाचा दोन दिवस अति अति त्रास झाल्यामुळे हे पत्र लिहीत आहे तरी यात काही कमी जास्त लिहिले असेल तर क्षमा करावी.

विलास लेले.
पुणे.

Comments

Popular posts from this blog

पुण्याचा विकास पर्यावरण दृष्टीने सकारात्मक व्हावा - मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे .

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाक्षिक पर्यावरणनिर्णय वृत्तपत्रचे उदघाटन .....

MTDC च्या माध्यमातून पर्यटकांसाठी दिवाळीनिमित्त अनोखी पर्वणी ...