“लोकसहभागातून कॉसमॉस या उपद्रवी परदेशी तणाचे समूळ उच्चाटन जोमाने सुरु...”
“लोकसहभागातून कॉसमॉस या उपद्रवी परदेशी तणाचे समूळ उच्चाटन जोमाने सुरु...”
मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) या हरित चळवळी अंतर्गत अनोख्या पद्धतीने स्वच्छ अमृत महोत्सव साजरा...
पर्यावरण निर्णय वृत्तसेवा -
आज दिवसेंदिवस आपल्या परिसरातील वनराई, हरित क्षेत्र उपद्रवी फिरंगी तणांमुळे झपाट्याने कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम आता त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर व ओघाने मानवी जीवनावर सातत्याने होत आहे. त्यातच सद्य पर्यावरणीय आणीबाणीत भारत देशावर होणाऱ्या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांच्या आक्रमणाची भर पडत आहे. हे फिरंगी घटक म्हणजे तण (वीड), उपद्रवी मासे, कीटक व सूक्ष्मजीव. यातील सर्वात दखलपात्र व गंभीर घटक म्हणजे तण होय. लोकसहभागातून या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांचे आपल्या राष्ट्रातून समूळ उच्चाटन व्हावे. तसेच माबिच्या माध्यमातून ‘तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत’ हा संदेश देखील जनमानसात रूढ करण्यात यावा या उद्देशाने आणि शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव (१७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर) साजरा करण्यासाठी सध्या कॉसमॉस सल्फ्यूरीयस् या उपद्रवी परदेशी (मेक्सिको) तणाचे आक्रमण व व्याप्ती रोखण्यासाठी या तणाच्या उच्चाटनासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पुणे शहरातील जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या तळजाई टेकडीवर सदर मोहीम रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
सदर मोहीम मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); बायोस्फिअर्स; डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेन, पुणे; पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर टेक्नोलॉजी; इंडियन स्वच्छता लीग – पुणेरी नायक, उद्यान व पर्यावरण कक्ष, पुणे महानगरपालिका; ग्रीन लाईफ फाऊंडेशन; स्वच्छ पुणे स्वच्छ भारत; जलदेवता सेवा अभियान; सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान; नेचर ट्रेल्स, वेताळ हिल; मॉडर्न कॉलेज गणेशखिंड; झाडे लावा झाडे जगवा अभियान, नऱ्हे, इतर सेवाभावी, शैक्षणिक व संशोधन आणि शासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि १०० हून अधिक हरित कार्यकर्ते, पत्रकार, विध्यार्थी, टेकडीप्रेमी, निसर्गप्रेमी यांच्या सहभागाने फत्ते झाली.
सदर उपक्रमाचे संयोजन आणि महत्वाची भूमिका डॉ. सचिन पुणेकर; श्री. सथ्या नटराजन; प्रा. अस्मिता जोशी; प्रा. अमोल इंगोले; प्रा. सुनील खोत; श्री. दत्तात्रय गायकवाड; श्री. शैलेंद्र पटेल, डॉ. नितीन अहिर; श्री. मंगेश ननावरे; श्री. पराग शिळीमकर; श्री. अभिजित भसाले; श्री. मंगेश निपाणीकर; डॉ. प्राची क्षीरसागर; श्री. संजय परोडकर; श्री. मुकुंद शिंदे; श्री. प्रशांत शेटे; श्री. प्रकाश इंदलकर यांनी बजावली.
कॉसमॉस या उपद्रवी आगंतुक/परदेशी तणाचा शहरांमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, गवताळ कुरणांवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे, लवकरच या वनस्पतीला पिवळ्या-केशरी फुलांचा बहर येईल. ही वनस्पती मूळची मेक्सिको मधली आहे, ही सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पती असून तिची फुलं चटकन लक्ष वेधून घेतात. कॉसमॉसचे फुलांचे सौंदर्य जनसामान्यांना, पर्यटकांना भुरळ घालत असते. कॉसमॉस या वनस्पतीचा वाढण्याचा वेग हा अधिक आहे. ही वनस्पती कमी पाण्यावर, अगदी ओसाड जमिनीतदेखील उत्तम तग धरू शकते. तसेच हीचा बीजप्रसार थोड्या कालावधीत सर्वदूर होतो. इतका की या वनस्पतीचाच मोठा पट्टा तयार होतो त्यामुळे भरपूर जागा या वनस्पतीने व्यापली जाते. या उपद्रवी परदेशी वनस्पतीमुळे स्थानिक गवताच्या व अन्य वनस्पतींच्या जाती-प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. या तणाची व्याप्ती मोठी असल्या कारणाने स्थानिक जैवसाखळीदेखील नष्ट होत आहे. अनेक कीटकांच्या जाती जसे की मधमाशी, भुंगे, फुलपाखरे आता मोठ्या प्रमाणात याचे परागकण गोळा करताना दिसतात. त्याचा देखील परिणाम स्थानिक वनस्पतींच्या परागीभवनावर होत आहे. आपल्या गुरांचे, वन्य तृणभक्षी प्राण्यांचे स्थानिक खाद्य वनस्पती या कॉसमॉस मुळे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. गुरांना आणि मानवाला देखील या उपद्रवी वनस्पतीची एलर्जी होत आहे आणि आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होत आहेत. या वनस्पतीला भरपूर फळे येतात. बीजधारणा मोठ्या प्रमाणात होते. या बिया वाऱ्याबरोबर किंवा इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वदूर पसरतात. टायरच्या नक्षीमध्ये देखील बिया अडकून बीज प्रसार सर्वदूर होतो, प्राण्यांच्या केसाला चिटकून किंवा इतर माध्यमातून देखील ही वनस्पती इतर ठिकाणी पसरते. काही अतिउत्साही लोक या फुल झाडाच्या बिया आपल्या घराकडे, बागेमध्ये लावण्यासाठी सोबत नेतात. अनेक जणांनी कॉसमॉस चे बीज मोठ्या प्रमाणावर सीड बॉल करून फेकल्या तसेच काही गिर्यारोह्कांकडून देखील दुर्गम भागामध्ये या आगंतुक तणांच्या बियांचा फैलाव अजाणतेपणे करण्यात आला. शिवाय या वनस्पतीवर कुठलेच नैसर्गिक नियंत्रण नसल्याने ही मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. वरील सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता या वनस्पतीचा फैलाव रोखण्यासाठी ती उगवलेली दिसताच आणि फुले येण्यापुर्वीच तिथून उपटून टाकणे हा उपाय योग्य आहे. या उपद्रवी तणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामपंचायती, सेवाभावी संस्था, शहरातील-गावातील नागरिक, शेतकरी, गाव पातळीवर किंवा शहर पातळीवर असलेल्या विविध समित्या, शासनाचे पर्यावरण किंवा वनसंवर्धन किंवा शेती व्यवस्थेबाबत असलेल विविध विभाग, आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून या आगंतुक तणाला पूर्णतः नष्ट करणं गरजेचे आहे. अनेक सजग नागरिक, सेवाभावी संस्था माबिच्या मार्गदर्शनातून काही काळापासून सातत्याने विविध भागात कॉसमॉस व इतर आगंतूक तण हटविण्याची मोहीम राबवित आहेत. हे तण काढून टाकण्यासाठी एक मोठी लोकचळवळ उभी रहात आहे.
जसं सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे तशी उपद्रवी परदेशी तण काढण्याची चळवळ सुद्धा उभी राहिली पाहिजे, रुजली पाहिजे. मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) ही जैविक आक्रमणा-विरोधात सुरु केलेली अशीच एक हरीत चळवळ आहे. कॉसमॉस बरोबर धनुरा किंवा गजर गवत या उपद्रवी परदेशी ताणाचे देखील उच्चाटन यावेळी करण्यात आले.
या चळवळीच्या माध्यमातून “हटवा तण-वाचवा वन, हटवा तण-वाढवा वन, हटवा तण-वाढवा कृषीधन” तसेच “तण मुक्त भारत - स्वच्छ भारत” हा जनजागृतीचा विचार आणि उपद्रवी आगंतुक तण हा एक प्रकारचा ‘ग्रीन गार्बेज’ म्हणजेच ‘हरित कचरा’ आहे हा नवोदित विचार देखील आम्ही अधोरेखित करून सर्वदूर नेत आहोत. या चळवळीत नागरीकांनी मोठ्या संखेत सहभागी व्हावं आणि अश्या पद्धतीच्या उच्चाटन मोहिमा आप-आपल्या जवळच्या ठिकाणी विविध तणांविरोधात घ्याव्यात असं आवाहन डॉ सचिन पुणेकर यांनी दिले.
Comments
Post a Comment